भारतामध्ये आज मासिक पाळीबद्दल बोलणं तितकं सहज नाही आहे. अशामध्ये जर तुम्हाला हे सांगितले कि भारतातील काही भागांमध्ये मुलीच्या मासिक पाळीची सुरुवात एखाद्या उत्सवासारखी केली जाते, तर तुम्हाला कसे वाटेल. होय मासिक पालीची सुरुवात दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात थाटामाटात साजरी केली जाते. संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि मुलीला स्पेशल फील केले जाते. यादरम्यान मुलीला अनेक भेटवस्तू देखील दिल्या जातात.
आसाम: जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा तुलोनिया बिया नावाचा सण साजरा केला जातो. जो एखाद्या विवाह सोहळ्याप्रमाणे असतो. यादरम्यान मुलीला कोणतेही काम करू दिले जात नाही आणि एका वेगळ्या खोलीमध्ये तिला सात दिवस ठेवले जाते. असे मानले जाते कि यादरम्यान सूर्य, चंद्र आणि तारे पाहणे अशुभ असते. नंतर ७ दिवसानंतर मुलीला एखाद्या नवरीप्रमाणे सजवले जाते आणि केळीच्या झाडासोबत तिचे लग्न लावले जाते. यादरम्यान मुलीचे सर्व नातेवाईक येतात आणि तिला भेटवस्तू देतात.
तामिळनाडू: येथे जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा मंजल निरातु विज़ा महोत्सव आयोजित केला जातो. लग्नाप्रमाणे कार्ड वाटले जातात. मुलीचे काका मिळून नारळ-आंबा आणि कडुलिंबाच्या पानांनी बनवलेली झोपडी बांधतात ज्याला सामान्य भाषेत कुडीसाई म्हणतात. त्यानंतर मुलीला हलक्या पाण्याने आंघोळ घातली जाते ज्यानंतर ती त्याच कुडीसाईत राहते. या झोपडीत (कुडीसाय) स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. त्यानंतर मुलीला आंघोळ घालून सिल्कची साडी नेसवली जाते. दागिने घातले जातात, या प्रक्रियेला पुण्य धनम् म्हणतात. झोपडी काढून पंडित घर शुद्ध करतात.
कर्नाटक: येथे, जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा ऋतू शुद्धी किंवा ऋतु कला संस्कार केले जातात. त्यानंतर मुलीला साडी नेसवली जाते जशी लग्नाच्या वेळी नवरीला घातली जाते. या प्रक्रियेद्वारे मुलीला मासिक पाळीशी संबंधित गोष्टी समजावून सांगितल्या जातात जेणेकरून तिला पुढील समस्यांना सामोरे जावे लागू नये.
आंध्रप्रदेश: जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा तिच्यासाठी घरी एक समारंभ केला जातो. ज्याला पेडमनिशी पंडगा म्हणतात. हे मासिक पाळीच्या पहिल्या, ५व्या किंवा शेवटच्या दिवशी केले जाते. पहिल्या दिवशी मंगलस्नान होते. ज्यामध्ये ५ महिला मुलीला अंघोळ घालतात. यामध्ये मुलीची आई नसते. त्यानंतर मुलीला वेगळ्या खोलीत ठेवले जाते. हा सोहळा जोपर्यंत सुरु असतो तोपर्यंत मुलीसाठी कपडे, जेवण, गादी, बेडशीट असे सर्व काही दिले जाते. शेवटच्या दिवशी मुलीला चंदनाची पेस्ट लावली जाते आणि तिचे काका तिला साडी आणि दागिने भेट देतात.
ओडिशा: पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर ओडिशात राजा प्रभा नावाचा सोहळा साजरा केला जातो. या काळात पृथ्वी मातेला मासिक पाळी येते असे येथील लोक मानतात. मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी मुलीला आंघोळ घातली जाते. महिला आणि मुली सर्व कामातून विश्रांती घेतात आणि नवीन कपडे घालून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करतात. या दरम्यान मुलगी कोणतेही काम करत नाही आणि नवीन कपडे आणि मिठाईचा आनंद घेते.