ग्रीस येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये पुण्याच्या वडगाव मावळ येथील हर्षदा गरुड हिने बाजी मारली आहे. हर्षदाने ४५ किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावत महाराष्ट्राचे नाव जागतिक नकाशावर झळकावले आहे. हर्षदाच्या घरी नागरिक पेढे घेऊन येत आहेत आणि त्यांचे अभिनंदन करत आहेत.

हर्षदा हिने वडगाव मावळ येथील दुबेज गुरुकुलमध्ये बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर देखील उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. २०१९ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले होते. गेल्या १५ दिवसांपूर्वीच तिची भारतीय संघामध्ये निवड करण्यात आली होती. त्याचवेळी तिने आपण सुवर्णपदक मिळवूनच परत येऊ असा निर्धार केला होता.

हर्षदाचे वडील हे वडगाव नगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा विभागामध्ये काम करतात. तर हर्षदाची आई हि गृहिणी आहे. हर्षदाच्या वडिलांना देखील वेटलिफ्टिंगमध्ये फार रुची होती पण त्यांना त्यामध्ये करियर करता आले नाही. त्यामुळे त्यांनी हर्षदाला वेटलिफ्टर बनवण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी हर्षदाला कोणतीही कमी पडू दिली नाही.

हर्षदाला एक उत्कृष्ट खेळाडू बनवण्याचे स्वप्न तिच्या वडिलांनी लहानपणापासून पाहिले होते. यासाठी त्यांनी हर्षदाला प्रशिक्षणासाठी दुबे सरांकडे पाठवले. आज हर्षदाने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. हर्षदाच्या आईवडिलांना आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने