ठाण्यामध्ये शिवसेना मजबूत करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट येत्या १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आनंद दिघे यांचा एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यामधील शिवसेनेचा प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकताच धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला अनेक दिग्गज उपस्थित होते.

धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग सोहळ्याला मुखमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर अभिनेता रितेश देशमुख, सलमान खान देखील उपस्थित होते. ट्रेलर लाँच सोहळा पार पडल्यानंतर अभिनेता सलमान खानने याबाबत प्रतिक्रिया दिली.

सलमान खानची प्रतिक्रिया: मी आता मराठीमध्ये बोलणार आहे. माझे नाव सलमान खान. मला धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला. मी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलत होतो तेव्हा त्यांनी दिघे साहेबांच्या बद्दल अनेक गोष्ट सांगितल्या.

यातल्या काही गोष्टींमध्ये मला माझ्यात आणि दिघे साहेबांमध्ये साम्य जाणवले. त्यामधील एक म्हणजे दिघे साहेब एकाच खोलीमध्ये राहायचे आणि मी देखील एकाच खोलीमध्ये राहतो. दुसरे म्हणजे त्यांचे लग्न झाले नव्हते आणि माझे देखील झालेले नाही. पूर्वी धरम वीर चित्रपट आला होता आता धर्मवीर चित्रपट येतो आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.

धर्मवीर चित्रपटामध्ये अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेना मजबूत करणारे कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघे यांना ओळखले जात होते. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे तर मंगेश देसाई यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने