मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ कलाकार अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. रवी पटवर्धन यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले मोलाचे योगदान दिले आहे.

अभिनेते रवी पटवर्धन यांनी मराठी नाटके, मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये देखील आपल्या उत्कृष्ठ अभिनयाचे प्रदर्शन केले होते. भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेल्या आणि भरदार मिशा आणि आपल्या खास आवाज लाभलेल्या रवी पटवर्धन यांनी गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश त्याचबरोबर खलनायकी अशा विविध भूमिका साकारून दर्शकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले होते.

तब्बल दीडशेहून अधिक नाटके आणि २०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. १९७४ मध्ये आरण्यक या नाटकामध्ये त्यांनी प्रथम काम केले होते आणि विशेष म्हणजे वयाच्या ८२ वर्षी ते याच नाटकामध्ये धृतराष्ट्राची भूमिका करत होते.

वाढत्या वयामुळे येणाऱ्या विस्मरणाच्या समस्येवर विजय मिळवत त्यांनी मेंदूची कार्यक्षमत वाढवण्यासाठी स्वसंमोहन शास्त्रदेखील शिकून घेतले होते. त्यांनी या विषयावर खूप अभ्यास केला होता. याच शास्त्राचा वापर करून त्यांनी आपल्या अनेक आजारांवर मात केली.

अग्गबाई सासूबाई या मालिकेमधील त्यांची आजोबांची भूमिका खूपच गाजली होती. रवी पटवर्धन हे मुंबई येथील रिजर्व बँकेमध्ये काम करत होते. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून शृंगेरी मठाची परीक्षा दिली होती आणि विशेष म्हणजे त्यांनी या परीक्षेमध्ये पहिले स्थान प्राप्त केले होते. १९८८ साली झालेल्या नाट्यसंमेलनामध्ये त्यांनी वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी भूमिका साकारली होती.

काल रात्री त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मार्च महिन्यामध्ये देखील त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता पण त्यातून ते सुखरूप बाहेर आले होते. त्यांच्या पश्चात त्यांना २ मुले, सुना, चार नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने