चित्यापेक्षा फास्ट, तरूणांना लाजवेल असा उत्साह, खेळायला लागल्यावर स्टेडियम पण लहान पडेल असे अफलातून शॉट्स आणि असा फिनशर की कोणतीही धावसंख्या त्याला मोठी वाटणार नाही... होय, या सर्व गोष्टी महेंद्रसिंग धोनीवर लागू होतात पण कदाचित शुक्रवारी रात्रीपर्यंत.

काल रात्री दुबईच्या खेळपट्टीवर झालेल्या सामन्याच्या अंतिम क्षणातची स्थिती पाहून लाखो लोकांची मने तुटली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा ७ धावांनी पराभव झाला. त्यांच्या पराभवाची ही हॅटट्रिक आहे, जे चेन्नई सुपर किंग्जसाठी अविश्वसनीय आहे. परंतु आपल्या आवडत्या खेळाडूला या स्थितीत पाहून हजारो चाहचे नाराज झाले.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत चेन्नई सुपर किंग्जला १६५ धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तर देण्यासाठी चेन्नई संघाचे केवळ सहा ओव्हर मध्ये तीन गडी अवघ्या ३६ धावात बाद झाले. यावेळी धोनी जास्त खाली आला नाही, तो नंबर ५ वर फलंदाजीसाठी उतरला. म्हणजेच, त्याला खेळण्यासाठी बराच वेळ होता. प्रथम त्याने केदार जाधव आणि त्यानंतर जडेजासोबत पार्टनरशिप केली, जडेजानेही अर्धशतक ठोकले. अन धोनी अजूनही खेळपट्टीवर टिकून होता.

जडेजा आऊट होताच

यानंतर १८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर रविंद्र जडेजा बाद झाला. तोपर्यंत धोनीने २७ चेंडूत २४ धावा केल्या होत्या. आणि त्यानंतर युवा सॅम कुरन खेळपट्टीवर आला. पण तेव्हा धोनीवर जबाबदारी अधिक वाढली होती. नेहमीप्रमाणे परिस्थिती बिकट होती. शेवटच्या दोन षटकांत चेन्नईला ४४ धावांची गरज होती. यानंतर धोनीला त्रास होऊ लागला. तो एकाद-दुसरी धाव घेत होता पण त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता.

प्रत्येक बॉलला तो थांबत होता तर कधीकधी तो गुडघ्यावर टेकून बसायचा. अखेरीस मेडिकल स्टाफला येऊन त्याला औषधे द्यावी लागली. पण धोनीला प्रत्येक चेंडूनंतर सारखा त्रास होत होता. शेवटी धोनीने ३६ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या पण चेन्नई सुपर किंग्ज ७ धावांनी पराभूत झाली होती.

सामना संपल्यानंतर धोनीने स्वत:च स्पष्ट केले

चाहत्यांनी धोनीला नेहमीच त्याला परिस्थितीशी झगडताना पाहिले आहे. त्याचे वय आता ३९ झाले आहे पण तरीही तो अजून विकेटकीपिंग करतो आणि विकेट्स दरम्यान धाव घेण्यासही तो कमी पडत नाही परंतु शुक्रवारी दुबईमध्ये उष्णतेने नवा उचांक गाठला होता. सामन्यानंतर धोनीला याबद्दल विचारले असता, त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आले. मला जास्त बॉल खेळता आले नाहीत. कदाचित मी खूप वेगवान मारण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत घसा खूप कोरडा होत होता. असे त्याने स्पष्टीकरण दिले.

आम्हाला या सुधारणांची गरज आहे

त्यानंतर, धोनीने कबूल केले की आपल्या संघाने सलग तीन सामने गमावले आहेत आणि अशा काही कमतरता आहेत ज्या कठोरपणे भरून काढण्याची गरज आहे. धोनी म्हणाला, आम्ही सलग तीन सामने क्वचितच गमावले आहेत. चुका सुधारल्या पाहिजेत. पुन्हा पुन्हा त्याच चुका करू शकत नाही. कॅच, नो बॉल याकडे लक्ष दिले पाहिजे होते.

आम्ही एकूणच चांगला खेळ करू शकलो असतो. जर हा नॉकआउट सामना असता तर झेल सोडणे फारच महाग पडले असते. होय, सामन्यात काही सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत आणि काही गोष्टी सुधारल्या देखील पाहिजेत. आम्ही पुन्हा तयारी निशी येऊ असे स्पष्टीकरण धोनीने दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने