दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा सुपरहिट चित्रपट 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' ३० सप्टेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानुसार आज, म्हणजेच ३० सप्टेंबर २०२० रोजी या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सुशांतसिंग राजपूत, कियारा अडवाणी आणि दिशा पटानी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच बिजनेस केला आणि एमएस धोनीच्या भुमिकेतील सुशांतसिंग राजपूतला प्रेक्षकांनी खूपच पसंत केले होते. पण दुर्दैवाने सुशांतसिंग राजपूत आता या जगात नाहीत. तर आज तुम्हाला आम्ही चित्रपटा सं-बंधित काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

एम. एस. धोनीची शाळा चित्रपटामध्ये

महेंद्रसिंग धोनी ज्या शाळेत शिकत होता तिच शाळा या चित्रपटात दाखवली गेली आहे. खरं तर, धोनीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेक्षकांना दाखवता यावा यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी शाळेच्या व्यवस्थापनांकडून विशेष परवानगी घेतली होती.

धोनीसारखे दिसण्यासाठी वाढवले होते केस

चित्रपटामध्ये धोनीची भूमिका साकारणाऱ्या सुशांतसिंग राजपूतने क्रिकेट खूप बारकाईने शिकले होते. तसेच त्याने महेंद्रसिंग धोनीच्या प्रत्येक लूकवर खूप बारकाईने काम केले होते. महेंद्रसिंग धोनीने सुरवातीचा काही काळ क्रिकेट खेळताना केस वाढवले होते, तर सुशांतने सुद्धा आपले केस धोनीसारखे वाढवले होते जेणेकरुन धोनीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेक्षकांना दाखवता येईल.

धोनीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारला केले होते रिजेक्ट

कदाचित तुम्हाला हे माहित नसेल पण धोनीच्या भुमिकेसाठी अक्षय कुमारला प्रथम कास्ट केले गेले होते. पण या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांना धोनीसारखा लुक अक्षय कुमारमध्ये दिसत नव्हता म्हणून त्यांनी या चित्रपटात अक्षय कुमारला घेतले नाही. त्यानंतर सुशांतसिंग राजपूतला एमएस धोनीच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले. मात्र, चित्रपटात धोनीसारखे दिसण्यासाठी सुशांतने खूप परिश्रम घेतले होते.

किरण मोरे यांनी दिले क्रिकेटचे ट्रेनिंग

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू किरण मोरे यांनी सुशांतला एमएस धोनीच्या भुमिकेसाठी प्रशिक्षण दिले. पण जेव्हा सुशांत धोनीचा लोकप्रिय हेलिकॉप्टर शॉट शिकत होता, तेव्हा तो जखमी झाला होता मात्र त्यानंतर स्वत: धोनीने त्याचा सुशांतला क्रिकेटची ट्रेनिंग दिले होते.

दिशा पटानीचा होता पहिला चित्रपट

दिग्दर्शक नीरज पांडे यांनी दिशा पटानीला या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला होता. दिशा पटानीचा अभिनय सुद्धा लोकांना खूप आवडला होता.

साक्षीची भूमिका कियारा अडवाणीने साकारली

माजी क्रिकेटर एमएस धोनीची पत्नी साक्षीची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणीने साकारली होती. आपल्याला माहित नसेल पण या चित्रपटात धोनी आणि साक्षीच्या लग्नाचे दृश्य दाखविण्यात आले आहे, ज्यामध्ये कियाराला अगदी साक्षीप्रमाणेच दाखवले गेले होते. खरं तर, यासाठी लग्नाचा पोशाख स्वत: साक्षीने कियाराला दिला होता.

कास्ट आणि चित्रपटाची कमाई

या चित्रपटाचे बजेट साधारण ८० करोड इतके होते. तर महेंद्रसिंग धोनीला यातून ४० कोटी देण्यात आले होते. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक अब्जाहून अधिक गल्ला जमवला होता. या चित्रपटात कियारा अडवाणी, अनुपम खेर, दिशा पटानी, भूमिका चावला, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा यांच्यासह सुशांतसिंग राजपूत हे मुख्य भूमिकेत होते.

दर्शकांनी चित्रपटाला खूप पसंती दिली

एमएस धोनीचा बायोपिक असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. तरी सर्व कलाकारांनी या बायोपिकसाठी खूपच मेहनत घेतली होती. खासकरुन धोनीच्या भूमिकेत सुशांतसिंग राजपूत हा एकदम फिट बसला होता. खरं तर सुशांत धोनीच्या या भूमिकेत एकदम रमून गेला होता. म्हणूनच प्रेक्षकांना अजूनही हा चित्रपट खूप आवडतो. महेंद्रसिंग धोनीने यावर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर १४ जून २०२० रोजी सुशांतसिंग या जगातून आपल्याला सोडून गेला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने