प्रसिद्ध विनोदी अभिनेता जगदीप यांचे बुधवारी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी शोले चित्रपटामध्ये सूरमा भोपाली या भूमिकेमधून दर्शकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळवली होती. बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये जगदीप नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्याचे खरे नाव सैयद इश्तियाक अहमद जाफरी असे होते. जगदीपसाठी बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणे सोपे नव्हते.

बॉलीवूडमध्ये कॉमेडी युगाची सुरुवात करणारे जगदीप यांना पहिल्या चित्रपटासाठी ६ रुपये मिळाले होते. लहानपणी त्यांना या चित्रपटाची ऑफर मिळाली होती, ज्यामध्ये त्यांना टाळी वाजवण्यासाठी ३ रुपये देण्यात आले होते. १९४७ मध्ये देशाचे विभाजन झाले आणि तेव्हा जगदीप यांच्या बॅरिस्टर वडिलांचे निधन झाले. ज्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली होती.

संघर्षामध्ये व्यतीत केले बालपण

कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जगदीपच्या आईने एका अनाथ आश्रमामध्ये स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. तर जगदीप स्वतः रस्त्यावर उभे राहून साबण आणि कंगवा विकू लागला. यादरम्यान एक दिवस बीआर चोपडा यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना चित्रपटांसाठी एक बालकलाकार म्हणून सामील करून घेण्यात आले. १९५१ मध्ये अफसाना चित्रपटामधून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

४०० चित्रपटांमध्ये केले काम

जगदीपने जवळ जवळ ४०० चित्रपटांमध्ये काम केले पण १९७५ मध्ये आलेल्या शोले चित्रपटामधील सूरमा भोपालीच्या भूमिकेमुळे त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली. त्यांचा डायलॉग ‘हमारा नाम सूरमा भोपाली ऐसे ही नहीं है’ खूपच लोकप्रिय झाला होता. त्यांनी पुराना मंदिर या एका हॉरर चित्रपटामध्ये अभिनय केला आहे आणि अंदाज अपना अपना या सलमान खानच्या चित्रपटामध्ये त्यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका देखील साकारली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने