एकदा एक तरुण शेतकरी डोंगरावर असलेल्या देवाच्या दर्शनाला जायला निघाला होता. डोंगरावरील देवस्थान तसे पायथ्यापासून लांब नव्हते पण शेतीची कामे त्याच्या मागे असल्यामुळे अनेक दिवस जाऊ जाऊ म्हणत त्याला जाणे काही होत नव्हते. दिवसभराचे शेतीचे काम आटोपून त्याने संध्याकाळी आपल्या सोबत भाकरी बांधून घेतली. मित्राकडून एका कंदिलाची सोय केली आणि कंदील घेऊन तो डोंगराच्या दिशेने चालू लागला.

गावाच्या सीमा ओलांडूपर्यंत खूपच अंधार झाला. ती अमावस्येची रात्र होती. खूपच गडद अंधार पडला होता. चालत चालत तो डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. त्याच्या हातामध्ये कंदीलतर होताच पण त्याचा प्रकाश जास्त नव्हता जेमतेम दहा बारा पाऊले जाता येतील एवढाच त्याचा प्रकाश पडत होता. यामुळे त्याच्या डोक्यामध्ये विचार आला कि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला डोंगर कसा चढता येईल. गडद अंधारामध्ये एवढ्याशा कंदिलाच्या प्रकाशामध्ये डोंगरावर चढणे त्याला खूप अवघड वाटू लागले.

कंदिलाच्या प्रकाशामध्ये तो सकाळ होण्याची वाट पाहत डोंगराच्या पायथ्याशीच बसला. बसून बसून त्याला कंटाळा येऊ लागला मग तो त्याच ठिकाण थोडा लवंडला आणि सकाळी होण्याची वाट पाहू लागला. तेव्हा अचानक त्याला कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. तसा तो शेतकरी तिथेच उठून बसला आणि ज्या दिशेने चाहूल लागली त्या दिशेने डोळे मोठे करून पाहू लागला.

अंधार जास्त असल्यामुळे त्याला काहीच दिसत नव्हते. त्याच्या डोक्यामध्ये विचार आला कि इतक्या अवेळी अंधाऱ्या रात्री कोण बर आलं असेल? इतक्यात त्याच्या कानावर एक आवाज पडला. रामराम पाहुणं..! असं का निजला आहात? शेतकऱ्याला तो आवाज एका वृद्ध व्यक्तीचा वाटला. तेव्हा शेतकऱ्याने पाहिलं कि ती व्यक्ती त्याच्याच दिशेने येत होती. त्याच्या हातामध्ये एक छोटा कंदील होता.

शेतकऱ्याने त्या व्यक्तीला रामराम केले आणि म्हणाला कि बाबा मी उजेडाची वाट पाहत बसलो आहे. म्हणजे डोंगरावरील देवळात दर्शनासाठी जाता येईल. ती वृद्ध व्यक्ती हसली आणि म्हणाली अरे जर तू डोंगर चढायचा निश्चय केला आहेत तर मग उजेड होण्याची वाट का पाहत बसला आहेस? तुझ्याजवळ तर कंदील पण आहे. मग इथे पायथ्याला का बसला आहे? तेव्हा तो शेतकरी म्हणाला इतक्या अंधारामध्ये डोंगर कसा चढायचा? तुम्हाला वेड लागले आहे का? या एवढ्याश्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये जेमतेम दहा बारा पाऊलेच पुढचे दिसते. मग डोंगर कसा चढता येईल? ती वृद्ध व्यक्ती हसून म्हणाली अरे तू त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये दहा पाऊले तर पुढे जा. तुला जेवढे समोरचे दिसेल तितके तरी पुढे जा. जसा जसा तू पुढे जाशील तसे तसे तुला पुढचे दिसत जाईल. फक्त एक पाऊल टाकण्यापुरता जरी प्रकाश असला तरी त्या एका पाऊलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येऊ शकते.

त्या वृद्ध व्यक्तीच्या बोलण्याने शेतकऱ्याचे डोळेच उघडले. तो उठला आणि त्याने डोंगर चढायला सुरवात केली आणि त्या छोट्याश्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये तो सुर्योदयापूर्वी देवळामध्ये जाऊन पोहोचला. सांगायचे तात्पर्य काय तर आपल्या देखील आयुष्यामध्ये नेहमीच असे घडत राहते. आपल्याला एखादे ध्येय गाठायचे असेल तर आपण फक्त कारण देत बसतो कि मला हे मिळाले तर मला हे करता येऊ शकते.

एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर तो म्हणतो माझ्याकडे भांडवल नाही मी व्यवसाय कसा करू. माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी व्यवसाय सुरु करणार आणि मग तो नोकरी करत बसतो. पण कमी भांडवलामध्ये देखील छोटा व्यवसाय सुरु करू शकता. एखाद्याला शरीर तंदुरुस्त करायचे असल्यास तो म्हणतो मी जिम जॉईन केल्यानंतरच व्यायाम सुरु करणार. पण दररोज घरी अर्धा तास जरी व्यायाम केला तरी देखील आपले शरीर चांगले होऊ शकते.

काही लोक म्हणतात कि आम्हाला खूप नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत पण पैसे नाहीत पण आज असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत जेथून आपण फ्रीमध्ये बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. आम्हाला फक्त एवढेच सांगायचे आहे कि आपण फक्त कारणे देऊन गोष्टी पुढे ढकलत असतो. आपल्या लक्षात येत नाही कि आपण आपला बहुमुल्य वेळ वाया घालवत आहोत आणि एकदा वेळ निघून गेली कि आपल्याला पश्चाताप होतो कि आपण जर योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या असत्या तर आज मी किती यशस्वी असतो.

म्हणून तुमची जी कोणती स्वप्ने असतील, ध्येय असतील ती मिळवण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा. छोटी छोटी पाऊले उचला, कारणे देत बसू नका. जेव्हा छोटी छोटी पाऊले उचलाल तेव्हा हळू हळू तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल. जो थांबला तो संपला आणि तो चालतो तो ध्येय गाठतोच. कारण चालणाऱ्यालाच पुढा रस्ता सापडत जातो. त्यामुळे कधीच आपला वेळ वाया घालवत बसू नका.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने